वीज पडून महिला ठार; तीन महिला गंभीर

कांदा लागवडीचे काम सुरू असताना वीज कोसळल्याने लता संजय पवार (वय ३५, रा. खडकी, कोपरगाव) ही महिला जागीच ठार झाली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यामध्ये इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागातून देण्यात आली.
संवत्सर येथील शिवाजी कासार यांच्या वस्तीवर कांदा लागवडीचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान वीजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. त्यामध्ये लता पवार ही महिला जागीच ठार झाली. तर, शेतामध्ये काम करणाऱ्या इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी संवत्सर येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी जखमींना दाखल केले. त्यानंतर तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आमदार स्नेहलता कोल्हे, तहसिलदार किशोर कदम, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, पुष्पा काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी महिलांची विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला.

शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस
शिर्डी : विजेच्या कडकडाटासह शिर्डी, राहता, श्रीरामपूर, नेवासे, प्रवरा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस पडला. त्याचा फटका बसला काढणी सुरू असलेल्या खरीपाच्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले. दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. वादळाने ऊस, मका पिके आडवी झाली. शिर्डी, राहता, श्रीरामपूर, लोणी-प्रवरा परिसर, नेवासे या ठिकाणी तासभर जोरदार पाऊस कोसळला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या सोयाबीन, बाजरीची काढणी सुरू आहे. जास्तीच्या पावसाने अगोदरच सोयाबीन पिवळे पडून पिक नासले आहे. आजच्या पावसाने त्याचे आणखी नुकसान केले. बाजरीचे तेच झाले. भाजीपाला पिके अगोदरच पाण्याने सडली आहेत.