पालिका कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा कायम

पालिका कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मध्यस्थीने सुटला तर त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल यासाठी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने घेण्याची खेळी भाजपने खेळायचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी महापौरांच्या मध्यस्थीने आयुक्त अजय मेहता यांच्याशी शिवसेना गटनेत्यांची दोन तास चर्चा होऊनही बोनसचा तिढा सुटला नाही.

पालिका कर्मचाऱ्यांना नेमका बोनस किती द्यावा, यासंदर्भात अजून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांच्यात एकमत झाले नाही. कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यास आयुक्त मेहता तयार आहेत. परंतु, नेमका बोनस किती द्यावा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर महाडेश्वर यांनी शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली. पण, बैठकीला भाजपचे गटनेते मनोज कोटक अनुपस्थित असल्याने बोनसच्या प्रश्नांवर भाजप शिवसेनेसोबत निर्णय घेण्यास तयार नसल्याची चर्चा होती.