सुशोभिकरण पुन्हा लालफितीत

पहिल्या टप्प्यानंतर कामाला गतीच नाह

आशिष पाठक, कल्याण

कल्याण ः कल्याणात शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेला काळा तलाव हा केवळ मनोरंजनाचे केंद्र नव्हे तर धार्मिक, ऐतिहासिक किनार या वास्तूला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य या तलावाच्या काठावरील एका अत्यंत छोट्या घरात होते. मात्र, या तलावाचे सुशोभिकरण करण्याचा बाळासाहेबांनी कल्याणकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यास तब्बल १५ वर्षे लागली. आता या तलावाच्या एका टोकाला बाळासाहेबांचे अत्यंत देखणे व महाराष्ट्रातील पहिले स्मारक उभे राहिले आहे. तलाव परिसर सुशोभित झाल्याने तिथे शेकडो लोक मनोरंजनासाठी येतात. संवेदना ट्रस्टतर्फे दरवर्षी होणाऱ्या काळा तलाव महोत्सवाला कल्याणकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. परंतु तलाव सुशोभिकरणाचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होणार, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.

काळा तलाव सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सहजानंद चौक ते वीर कोतवाल चौक आणि मच्छिमार सोसायटीपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकापर्यंत रस्ता रुंदीकरण अद्याप होऊ शकलेले नाही. ते झाल्यावर होणाऱ्या मोकळ्या जागेत प्रशस्त उद्यान साकारण्याचे नियोजन आहे. त्यानंतर केवळ तलाव सुशोभिकरण नाही तर सहजानंद चौकातील वाहतूक कोंडी सुटेल. तेथील रहिवाशांचे उंबर्डे येथे बीएसयुपी योजनेत पुनर्वसन झाल्यावर त्यांचे राहणीमान उंचावेल आणि तलावालगतच बगीचाही फुलेल, असा तिहेरी फायदा या योजनेचा आहे. पण अद्याप या सगळ्या ५५० बाधितांचा बायोमेट्रिक सर्वेक्षणही पूर्ण झालेले नाही.

उंबर्डे येथे घरे तयार असल्याने पालिकेने ठरवल्यास अवघ्या महिन्याभरातही रस्ता रुंदीकरण मार्गी लागू शकते. पण पालिकेतील शिवसेनेचे महापौर, स्थायी समिती सभापती व गटनेते ही बाब नेमकी केव्हा मनावर घेणार हा प्रश्न आहे.

काळा तलावाचे सुशोभिकरण हा नेहमीच पालिकेतील राजकारणाचा मुद्दा ठरला आहे. पण तलावाच्या सुशोभिकरणासाठी पालिकेकडे पैसा नसेल तर सीएसआरमधूनही पैसा सहज उभा केला जाऊ शकतो. त्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे.