उत्कंठावर्धक! थरारक विजयासह भारताचा वनडे मालिकेवर कब्जा

कानपूर – शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत भारताने न्यूझीलंडवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 2-1 ने कब्जा केला. भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा सलग सातवा मालिकाविजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने फटकावलेली शतके. त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी पाहुण्यांच्या फलंदाजीस घातलेली वेसण आणि शेवटच्या चार षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने केलेली भन्नाट गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली.

भारताने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली.  कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टिल यांनी यजमान गोलंदाजांवर आक्रमण केले. गप्टिल 10 धावा काढून बुमराची शिकार झाला. मात्र मुनरोने कर्णधार केन विल्यम्सनच्या साथीने गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. मुनरो आणि विल्यमसन यांनी 110 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला दीडशेपार मजल मारून दिली. दरम्यान, मुनरो (75) आणि विल्यमसन (64) ठरावीक अंतराने बाद झाल्याने किवी अडचणीत आले. त्यानंतर रॉस टेलर (39) आणि हेन्री निकोल्स (37) आणि टॉम लेथम (65) यांनी जबरदस्त फटकेबाजी करत न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. मात्र टॉम लेथम चुकीच्या क्षणी धावचीत झाला आणि सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. शेवटी न्यूझीलंडचा संघ विजयापासून 6 धावांनी दूर राहिला. भारताकडून बुमराने तीन, चहलने दोन आणि भुवनेश्वर कुमारने एक बळी टिपला.

तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर  338 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटने केलेली द्विशतकी भागीदारी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 6 बाद337 धावा फटकावल्या.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, सातव्या षटकात टीम साऊदीने भारताला पहिला धक्का दिला. शिखर धवनला त्याने 14 धावांवर झेलबाद करून माघारी धाडले.  शिखर धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी द्विशतकी भागीदारी करत भारताला सुस्थितीत नेले.  दरम्यान रोहित शर्माने आपले वनडे कारकीर्दीतील 15 वे शतक पूर्ण केले.

दरम्यान, रोहित शर्मा 147 धावा काढून माघारी परतला. रोहित आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 230 धावांची भागीदारी केली.  रोहित बाद झाल्यावर विराटने एकदिवसीय कारकीर्दीतील आपले 32 वे शतक पूर्ण केले. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. फटकेबाज हार्दिक पांड्या आज चमक दाखवू शकला नाही. तो 8 धावा काढून बाद झाला. तर विराट कोहली शतक पूर्ण झाल्यावर 113 धावा काढून साऊदीची शिकार झाला. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (25) आणि केदार जाधव (18) यांनी फटकेबाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.