नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन

नवी दिल्ली : बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे, परंतु भविष्याच्या दृष्टीने गोलरक्षक सविता पूनिया हिच्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही. याला कारण म्हणजे, नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतरही सविता नोकरीच्या शोधात आहे.
भारताला आशिया चषक मिळवून देण्यात निर्णायक कामगिरी बजावलेल्या सविताच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. परंतु, अजूनही तिचा नोकरीचा शोध थांबलेला नाही. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केलेल्या सविताने जपानच्या काकामिगहरा येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कारकिर्दीतील १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दिवंगत आजोबा महिंदर सिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॉकी खेळण्यास सुरुवात केलेल्या सविताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेकदा चमकदार कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, इतके यश मिळवूनही तिला नोकरीने मात्र हुलकावणी दिली.
जपानहून भारतात परतल्यानंतर हरियाणाच्या सविताने म्हटले की, ‘‘माझे वय आता २७ वर्षे होणार असून, गेल्या नऊ वर्षांपासून मी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. हरियाणा सरकारच्या ‘पदक आणा, नोकरी मिळवा’ योजनेंतर्गत मला आशा होती. परंतु, नेहमी मला आश्वासनेच मिळाली.’’ २०१३मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही मलेशियाविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवून सविताने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. सविताचे वडील फार्मासिस्ट असून, आपल्या खर्चासाठी सविता वडिलांवरच अवलंबून आहे.
‘‘मी नऊ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत असून, आजही मी स्वत:च्या खर्चासाठी आई-वडिलांवर अवलंबून आहे. खरं म्हणजे या वयामध्ये मला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळेच दरवेळी माझ्या मनात एकच विचार सुरूअसतो, की माझ्याकडे नोकरी नाही. असे असले तरी या गोष्टीचा मी माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ देत नाही. मात्र, प्रत्येक यशानंतर एका आशा असते. हे चक्र अनेक वर्षांपासून सुरूच आहे,’’ अशी खंतही सविताने मांडली.

आशिया चषक पटकावणे खरंच खूप मोठे यश आहे. रिओ आॅलिम्पिक पात्रतेनंतर माझ्या कारकिर्दीतील हे सर्वांत मोठे यश आहे. आपले क्रीडामंत्री स्वत: आॅलिम्पिकपदक विजेते आहेत आणि मला विश्वास आहे,की ते माझी परिस्थिती समजून घेतील आणि मला नोकरी मिळेल. आशिया चषक पटकावल्यानंतर भारतात महिला हॉकीचा खूप प्रसार होईल. यामुळे मुली मैदानात नक्की येतील याची खात्री आहे. आम्ही आमच्या मेहनतीवर विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला असून, भविष्यात याच कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती करु.