दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर

बरेली – अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे. बरेलीमधील दामोदर पार्क येथे आयोजित सभेत युवा क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भुवनेश्वर सिंह यांनी घोषणा केली की, दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-या व्यक्तीला महासभेकडून एक कोटी रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. दरम्यान पद्मावती चित्रपटाच्या विरोधात बरेलीत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 150 पुतळ्याचं सामूहिक दहन करण्यात आलं.

भुवनेश्वर सिंह बोलले आहेत की, आगीत जळणं काय असतं याचा अनुभव दीपिकाला दिला जाईल. चित्रपट प्रदर्शित करण्याआधी आमच्या संघटनेच्या पदाधिका-यांना दाखवण्यात यावा अशी आमची मागणी आहे. दुसरीकडे बरेलीचे एसपी रोहित सिंह सजवाण यांनी आपल्याला यासंबंधी काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान दुसरीकडे हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली. नुकतंच काही दिवसांपुर्वी मेरठमधील एका व्यक्तीने दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला पाच कोटीच्या बक्षिसाची घोषणा केली होती. यावर बोलताना सूरजपाल बोलले आहेत की, ‘आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार’.

दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापणा-याला आपल्याच समाजातील लोकांकडून 10 कोटी गोळा करुन देण्यात येतील असं सूरजपाल अम्मू बोलले आहेत. इतकंच नाही तर, जो कोणी संजय लिला भन्साळी यांचं शीर कापेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ अशीही घोषणा त्यांनी केली आहे. रणवीर सिंह याने एका मुलाखतीत आपला भन्साळींना पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. यावर बोलताना त्यांनी रणवीर सिंगला धमकी देत, आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्याचे हात पाय तोडण्यात येतील अशी धमकीच देऊन टाकली.

‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले
चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.

निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ आहे असे कारण देत चित्रपट सेन्सॉर बोर्डानेही अद्याप या चित्रपटाला जाहीर प्रदर्शनाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ‘व्हायकॉम १८’च्या प्रवक्त्याने रविवारी एका निवेदनात म्हटले की, आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत व या देशातील कायदे व सेन्सॉर बोर्डासह सर्व वैधानिक संस्थांविषयी आम्हाला आदर आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा मुंबईत माध्यम प्रतिनिधींसाठी खासगी शो आयोजित केला होता. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच संदर्भात बोर्डाचे एक सदस्य अर्जुन गुप्ता यांनी भन्साळी प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला.