कपिल पाटील यांची ३ कोटींची आॅफर

पडघा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम करावे, यासाठी मला त्यांनी तीन कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी रात्री खळबळ उडवून दिली. ही आॅफर धुडकावून युतीधर्म म्हणूनच माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी पाटील यांचे काम केले. आमच्यामुळेच ते खासदार झाले, पण आता ते मग्रुरीने वागत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झालेल्या कपिल पाटील यांचे राजकारण मग्रुरीचे आहे. शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचा आरोपही प्रकाश पाटील यांनी केला. म्हणूनच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, मनसे आणि रिपब्लिकन (से.) असे पक्ष एकत्र आले असून जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष हा या महाआघाडीचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादीचे विविध नेते उपस्थित होते.