वसईतील एसटीची शालेय बससेवा सुरू, विद्यार्थ्यांना पासचेही वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पहाटे शेकडो विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागल्यानंतर वसईत प्रचंड उसळलेला संताप लक्षात घेऊन एसटीने शालेय बससेवा पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासही देणे सुरु केले आहे.
एसटी महामंडळाने ६ डिसेंबरपासून शहरी मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांना बसला होता. एसटीनुसार वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेने पहाटेची शालेय बस न सोडल्याने वसईच्या पश्चिम पट्ट्यातील शेकडो विद्यार्थ्यांन कडाक्याच्या थंडीत कुÞडकुडत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागले होते. त्यानंतरही बस न आल्याने विद्यार्थ्यांना एक दिवस शाळा आणि कॉलेजला मुकावे लागले होते. दुसरीकडे, एसटीनुसार पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते शेवटच्या लोकलपर्यंत बस सेवा देण्यास परिवहन सेवा अपयशी ठरली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचेही हाल होऊ लागले आहेत.याचे तीव्र पडसाद वसईच्या ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. जनआंदोलन समितीने विद्यार्थी आणि प्रवाशांना सोबत घेऊन शनिवारपासून आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, एसटी आणि परिवहन विभागाने सुरळीत बस सेवा देऊ, असे आश्वासन प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना दिल्यानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
सध्या एसटी शालेय बस सेवा सुरु ठेवणार असून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील पासही देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

आता महापालिका एसटीविरोधात याचिका

हायकोर्टाच्या निर्देशानुसार वसईत एसटी आणि परिवहनने बस सेवा देणे बंधनकारक आहे. असे असताना एसटीने बस सेवा बंद करून हायकोर्टाचा अवमान केला आहे. तर परिवहन सेवेचा कारभार बिनभरोसे आहे. त्यामुळे हायकोर्टाचा अवमान केल्याची याचिका एसटी आणि महापालिकेविरोधात दाखल करणार आहोत, अशी माहिती याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी दिली.