ठाण्यात सासराच करत होता सुनेवर अत्याचार; रिक्षाचालक सासरा गजाआड

ठाणे : ठाण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत, पोटच्या मुलासह नातवंडांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेली पाच वर्षे सुनेवरच सासरा अत्याचार करत असल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या ५२ वर्षीय रिक्षाचालक सास-याला शुक्रवारी रात्री अटक केली.
तक्रारदार आणि आरोपी हे दोघे वागळे इस्टेट परिसरात राहतात. तक्रारदार तीसवर्षीय सून गृहिणी असून आरोपी सासरा हा रिक्षाचालक आहे. सुनेने दिलेल्या तक्रारीत, सासरा हा २०१३ पासून ते डिसेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यादरम्यान नेहमीच कामाच्या निमित्ताने जवळ बोलवून विनाकारण अंगाला स्पर्श करत होता. तसेच तिच्या पतीस आणि मुलांना जीवे मारण्याची त्याचबरोबर तिची बदनामी करण्याची धमकी देऊन घरी तसेच वागळे इस्टेट येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरी तसेच कापूरबावडी येथील लॉजमध्ये गेली पाच वर्षे वारंवार अत्याचार करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री त्या रिक्षाचालक सासºयाला पोलिसांनी अटक केली. शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केल्याची माहिती श्रीनगरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक सायकर यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यू.बी. गावडे करत आहेत.